Sunday, 8 December 2013

अतिथी संपादिका - सौ. विजया प्रकाश पाटील




"कविता सागर" नियतकालिक आणि उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या वतीने फक्त केवळ कवितांसाठी असलेला कविता सागर दिवाळी अंक वाचकापर्यंत पोहचवायचं काम मागच्या अनेक महिन्याच्या अथक प्रयत्नाने साकार झालं आहे, संपादक व सल्लागार मंडळाचे अथक प्रयत्न सार्थकी लागले आहेत. त्यांनी जर मनावर घेतले नसते तर ह्या कविता कदाचित कवीच्या मनातच किवा डायरी मध्येच राहिल्या असत्या. काही कविता हवेत विरून गेल्या असत्या आणि कवीच्या मनातील भावना कुणाला कळल्याच नसत्या. कवी हा संवेदनशील असतो, त्यांच्या मनातील भावना थोडक्या शब्दात तो मांडतो. त्याच्या मनातला एखादा कोपरा कुठे तरी दुखावलेला किवा आनंदाने फुललेला असतो, त्यावेळी त्याला कविता स्फुरतात. अशा सर्वच कविता प्रसिद्ध होतात असे नाही. पण आज ‘कविता सागर’ च्या वतीने अशा भावनांना एक संधी निर्माण करून दिलेली आहे, सर्वांचे एक हक्काचे व्यासपीठ तयार केलं आहे. कविता सागर दिवाळी अंक आपल्या हातात देत असताना आम्हाला आनंद होत आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामधून शेकडो कवींनी त्यांच्या निवडक कविता प्रकाशनार्थ पाठवल्या.  प्राप्त झालेल्या कविता मधून निवडक कविता या अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, ह्या पैकी काही उत्तम कविता व लेख महाजालावरून घेण्यात आलेले असून त्यांचे ऋण निर्देश व संदर्भ शक्य तिथे देण्यात आले आहेत. फक्त अभिजात साहित्य प्रसिद्ध व्हावे आणि नवोदितांनी खितपत पडावे हा दृष्टीकोन योग्य वाटत नाही. शेवटी दर्जा कुणी ठरवायचा? समाजातल्या तथाकथित मुठभर उच्चभ्रू आणि अभिरुची संपन्न लोकांनी? समाजात अनेक वर्ग आहेत, या वर्गाचे जगण्याचे तत्वज्ञान, त्यांचे संघर्ष, त्यांची स्वप्ने हि एकमेकापासून भिन्न असतात, व काहीवेळा परस्पर विरोधीही असतात. त्यामुळे प्रत्येक वर्गाच्या अंतरीच्या आवाजाला समाजापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे असे आम्हास वाटते. ज्या जंगलात वाघ, सिंह, लांडगे, व तरस राहतात, त्याच जंगलात हरणे, ससे, वानरे, माकडे व खारी पण राहतात. त्यांच्या जगण्याचा मुलभूत अधिकार जितका महत्वाचा तितकेच महत्वाचे आहे प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळणे. 

कवी मनातील सर्व संवेदना आपल्या कवितेमधून मांडत असतो. कविता हे केवळ व्यक्तीगत रडगाणे नसते, तर ती आजूबाजूच्या वास्तवाचाही उलगडा करीत असते. कवी हा एकाच वेळी जळत असतो आणि फुलत ही असतो. जीवनातल्या अनुभवाची अत्यंत कमी शब्दात सार्थ मांडणी करण्याचे सामर्थ्य केवळ कवी मध्येच असते. ही गोष्ट लक्षात घेवून जास्तीत जास्त नवकवींना कविता सागर मधून प्रसिद्धी देण्यात आली आहे, कविता सागर च्या भविष्यातील अंकामधून हजारो कवीसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केले जात आहे.

जर इतिहास अमर करायचा असेल तर काव्य हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण काव्यात गोडी असते. ताल, सूर, लय असतात, जे मनावर खोल परिणाम करतात. काव्य मृदु असते, काव्यात सौंदर्य असते, माधुर्य असते, शृंगार असतो, विरह असतो, शौर्य असते पण कौर्य नसते. काव्यात कोणत्या भावना व्यक्त होतात यावर काव्य प्रकार ठरवतात. ‘जे न देखे रवि ते देखे कवी’ - या उक्तीप्रमाणे  कवी आपल्या प्रतिभेने ह्या विश्वाच्या पलिकडे जावून विचार करू शकतो आणि नवनिर्माणाची आस जगवतो. हा अंक ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर काढत असल्यामुळे आम्ही लेखनासाठी मानधन देऊ शकलो नाही हे नम्रपणे नमूद करत आहोत. त्याच बरोबर “कविता सागर” दिवाळी अंक बुक गंगा डॉट कॉम च्या माध्यमातून संपूर्ण जगात जिथे कुठे मराठी माणूस असेल त्या प्रत्येक ठिकाणावरून फक्त एका क्लिक वर वाचता येणार आहे.  

कविता सागर दिवाळी अंक 2013... दर्जेदार वाचनीय मजकुराने सजलेला आहे - विविध काव्यविषयक लेख. बहारदार कवितांनी नटलेला आहे - विविध विषयावरील कविता. नामवंत साहित्यिकांच्या सहभागाने खुललेला आहे - शंभरपेक्षा अधिक साहित्यिकांचा समावेश आहे. कविता सागर मधील सर्वच साहित्य वाचनीय, हृदयस्पर्शी आहे. नवीन लेखक, कवी प्रकाशात यावेत म्हणून नवोदितांना 'एक चांगले व्यासपीठ' निर्माण झाले आहे.  या सर्व साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कविता सागर हा दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे. एकंदरित पाहता, आजचे युग हे संगणकप्रधान आहे असे म्हटले तर काही वावगं वाटू नये, अगदी लहान मुलांपासुन ते वयोवृद्धांपर्यंत संगणकाचे वेड वाढत आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे वयोवृद्ध मंडळी तर संगणकातील नवनविन गोष्टी पाहण्यास उत्सुक असतात. या सर्वाचा विचार करता या वर्षी कविता सागर दिवाळी अंकात खास ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, विविध विषयावरील  अभ्यासपूर्ण लेख ज्येष्ठ नागरिकांनी लिहिलेले आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे सदर प्रेरणादायी लेख वाचकांना निश्चितच आवडतील असा आम्हांला विश्वास आहे.

कविता सागर प्रकाशन, जयसिंगपूर यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्वप्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कविता सागर" गेल्या वर्षी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. कविता सागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवा मार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला होता. या वर्षीचा अंक सर्वदूर पोहचविण्यासाठी संपादक मंडळ कामाला लागले आहे.
-         सौ. विजया प्रकाश पाटील  
अतिथी संपादिका


o        छोटया - छोटया गोष्टीद्वारे आरोग्य शिक्षण देणारे पुस्तक ...
o        अतिशय माहितीपर आणि उदबोधक पुस्तक
o        पुस्तकातील सर्वांगसुंदर कथांमधून मोठ्यांबरोबर लहानांचेही उदबोधन
o        निरंतर शिक्षण क्षेत्रातही प्रौढाना अत्यंत मार्गदर्शक कथा...
o        प्रसंगानुरूप भरपूर चित्रे असलेने विषयाचा बोध चटकन होतो...
गोष्टीतून आरोग्यशिक्षण 
लेखक - बाबुराव शिरसाट
प्रतिक प्रकाशन, प्लॉट # २३, सुश्रुषानगर,
देवकर पाणंद, कोल्हापूर, जिल्हा - कोल्हापूर
दूरध्वनी - ९७३०४०८५९०
मुल्य - 100 रुपये + (टपाल खर्च रुपये 10  = एकुण 110/-)                     पृष्ठ संख्या - 96
पत्रव्यवहार, कवितांचे संकलन / निवड, अक्षर जुळणी, कागद, छपाई, बांधणी इत्यादी खर्चाचा विचार करता "कविता सागर" दिवाळी अंक 2013 ची प्रत कवींना मोफत अंक पाठवणे शक्य झाले नाही, त्याच बरोबर ज्या कवी व वाचकयांना महाजालावरून या अंकाचा आनंद घेता येणे शक्य नाही, अशा निवडक कवीसाठी मर्यादित प्रती छापील स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आल्या असून दिवाळी अंकाची प्रत ज्या कवींना हवी असेल त्यानी तशी आगावू नोंदणी करून आपली निराशा टाळावी.

अनेक नियतकालिकांनी आमच्या या उपक्रमाला आपल्यासारख्या हजारो वाचक - कवी - कवीयित्री यांच्या पर्यंत पोहोचवण्यात सहकार्य केले त्या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. कविता सागर नियतकालिकाच्या नववर्ष विशेषांकाच्या तयारीला आम्ही लागलो आहोत, ज्या कवींच्या कविता दिवाळी अंकात प्रसिद्ध होवू शकल्या नाहीत, त्यांना नववर्ष विशेषकांत स्थान देण्यात येईल.

आपल्या स्वलिखित दोन निवडक कविता, आपला साहित्यिक  परिचय, नांव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि काव्य लेखनासंबंधित अन्य माहिती (उदा. कवितांचा प्रकार, आजवर प्रकाशित झालेले साहित्य प्रकार - नियतकालिकाचे नाव - प्रकाशन वर्ष, मान सन्मान / पुरस्कार यांची सविस्तर माहिती, केव्हापासून कविता करता, छंद / आवडी - निवडी इ.) अलीकडे काढलेल्या पासपोर्ट छायाचित्रासह  आपले साहित्य (हस्तलिखित) शुद्ध, सुवाच्य, व कागदाच्या एकाच बाजूस लिहिलेले अथवा टंक लिखित करून कविता सागर प्रकाशन संस्थेकडे पाठवावे.

आपल्या कविता संस्थेकडे पोहोचल्यावर त्याची पोच शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. मात्र लिखाणाची पोच म्हणजे स्वीकृती नव्हे ह्याची कृपया नोंद घ्यावी. लिखाण पाठवण्याची अंतिम तारीख उलटल्यानंतरच आलेल्या लिखाणातून निवड केली जाईल व त्यानंतर स्वीकृती / अस्वीकृती कळवली जाईल.  तर कवी बंधू आणि भगिनीनो हे व्यासपीठ सर्वांसाठी आहे. तुमच्या आस - पासच्या कवींना सुद्धा तुम्ही प्रोत्साहन द्या व त्यांना संधी निर्माण करून द्या, फक्त थोडया प्रोत्साहनाची गरज सर्वाना असते.

1 comment:

  1. कवितासागर दिवाळी अंकाला पुरस्कार
    करवीर काशी फौंडेशन, कोल्हापूर यांच्यातर्फे राज्यस्तरीय दिवाळी अंक 2013 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या मध्ये महाराष्ट्रातील शेकडो दिवाळी अंकांनी आपला सहभाग नोंदवला होता. मराठी माणसाच्या दिवाळीचा जणू अविभाज्य भाग झालेल्या दिवाळी अंकांच्या शतकोत्तर परंपरेचे औचित्य साधून यंदाच्या उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कार देण्यासाठी आयोजित केलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या "कवितासागर" दिवाळी अंकाने विशेष उल्लेखनीय दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले आहे. लवकरच कोल्हापूर येथे होणा-या पुरस्कार वितरण सोहळ्यात "कवितासागर" च्या अतिथी संपादिका व ज्येष्ठ कवयित्री सौ विजया प्रकाश पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि दिवाळी अंकांची सुरू असलेली 105 वर्षांची परंपरा यापुढेही कायम राहावी, तसेच वाचकांना यापुढेही दर्जेदार दिवाळी अंक वाचायला मिळावेत, यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे व या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे करवीर काशी फौंडेशन, कोल्हापूर चे अध्यक्ष सुनीलकुमार सरनाईक यांनी सांगितले.

    उदयोन्मुख कवी यांचं एक हक्काचं व्यासपीठ कवितासागर प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित एक आगळा वेगळा व कौतुकास पात्र ठरलेला, अनेक नवकवींच्या कवितांना सर्वप्रथम स्थान देणारा व फक्त केवळ कवितांसाठी असलेला एकमेव दिवाळी अंक "कवितासागर" गेल्या वर्षी सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. कवितासागर दिवाळी अंक जगभरात कुठेही फक्त एका क्लिकवर उपलब्ध करून दिल्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाचनाचा नवा मार्ग स्वीकारणा-या नव्या दमाच्या वाचकांसाठी एक पर्वणी ठरला होता, या वर्षीचा अंक सर्वदूर पोहचविण्यासाठी संपादक मंडळाने चांगले प्रयत्न केले आहेत. 01 नोव्हेंबर 2013 रोजी दिवाळी अंक प्रसिद्ध होवून सर्वत्र वितरीत केला गेला. कवितासागर सर्व लेखक कवी यांच्या साहित्याला प्रसिद्धी देण्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत कविता सागर प्रकाशनाने अनेक लेखक कवी यांचे साहित्य प्रसिध्द केले आहे, आणि नुसतेच प्रसिद्ध केले नाही तर हे सर्व लिखाण जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचवले आहे, यावर्षीचा दिवाळी अंक हा जगभरातील ई-दिवाळी अंकांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. कवितासागर मधील सर्वच साहित्य वाचनीय, हृदयस्पर्शी आहे. नवीन लेखक, कवी प्रकाशात यावेत म्हणून नवोदितांना 'एक चांगले व्यासपीठ' निर्माण झाले आहे. या सर्व साहित्याचा आस्वाद घेऊ इच्छिणा-या रसिक वाचकांना इंटरनेटवरील दिवाळी अंक उपयुक्त ठरणारा आहे. कवितासागर हा दिवाळी अंक इंटरनेट बरोबरचं आयपॅड व स्मार्ट फोनवरही उपलब्ध आहे.

    पाटलोबा पाटील, बाळ बाबर, डी. बी. चिपरगे, डॉ. कुमार पाटील, अनिलकुमार पाटील, त्रिवेणी हरोले, सौ माधुरी काजवे, सौ. स्वप्नजा घाटगे, संजय सुतार, किरण पाटील, विजय बेळंके, दिशा शिंदे, अनिल धुदाट, प्रकाश केसरकर, डॉ. विजयकुमार माने, शांतीनाथ पाटील, जयंत पठाडे, प्रा. दिवाकर बोबडे, मयुर ढोलम, सदाशिव कुंभार, उज्ज्वला माघाडे, मयुरी नाईक, डॉ. नंदकुमार नहार, पूजा डकरे, रमेश इंगवले, सुहास समडोळे, शफी बोल्डेकर, अशोक पाटील, विष्णू वासुदेव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या कवितांनी या अंकाची उंची वाढवली आहे. वाचन संस्कृती लयाला जात चालली आहे, असे कितीही म्हटले तरी ते चुकीचे आहे. अन्यथा दरवर्षी दिवाळी अंकांची भर पडली नसती. दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे वैभव आहे, असे मत ज्येष्ठ कवी व साहित्यिक अनिल धुदाट (पाटील) यांनी व्यक्त केले. नवसाक्षर व खेडोपाडय़ातील वाचन करणारे अनेक वाचक मला भेटतात. त्यामुळे वाचनसंस्कृती लयाला गेलेली नाही, दिवाळी अंकाने ते स्थान राखून ठेवले आहे, असेही अनिल धुदाट यांनी सांगितले.

    या वर्षीच्या कवितासागर दिवाळी अंकात खास ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून, या मध्ये बी. बी. गुरव, जयंत बेंद्र, डॉ. बी. ए. शिखरे, मधुकर खासगीवाले, डी. बी. चिपरगे यांनी लिहिलेले लेख आहेत.

    कवितासागर प्रकाशन गेल्या अनेक वर्षांपासून "कवितासागर" या दिवाळी अंकाची सातत्याने निर्मिती करीत आहे. गतवर्षी कवितासागरच्या दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. त्याच बरोबर या पूर्वीही सर्वोकृष्ट दिवाळी अंक म्हणून कवितासागरला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल, “कवितासागर” चे प्रकाशक डॉ सुनील पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





    ReplyDelete